बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गरजू रुग्णांना त्वरेने रक्तपुरवठा करण्यासाठी रक्त संकलन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी १५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन चिखली मार्गावरील सहकार विद्या मंदिर येथे केले आहे.शासकीय कर्मचाऱ्यासह नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रचार आणि प्रसार करण्यात येत असला तरी विदर्भासह जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाल्यामुळे रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा केला जाऊ शकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. काही वर्षांत विविध सामाजिक संस्थांतर्फे रक्तदान शिबिरे आयोजित केली जात असली तरी त्यातून पाहिजे त्या प्रमाणात रक्तदान होत नाही.आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही रक्ताच्या कारखान्याची निर्मिती करू शकले नाही. शासकीय पातळीवर रक्तदान संदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाहीत. एका व्यक्तीने एकदा रक्त दिल्यानंतर साधारणत तीन महिन्यांनी रक्त देणे आवश्यक आहे. मधुमेह असलेले रुग्ण जर इन्शुलिन घेत असतील तर त्यांना रक्तदान करता येत नाही. रक्तदान करताना शरिरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ ग्रॅमपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. रक्तदानानंतर शरिरात रक्ताची पूर्ती २४ तासात होते. रक्तदाताच्या शरीरातून ३५० किंवा ४५० मि.लि. पर्यंत रक्त घेऊ शकतात. त्यामुळे रक्तदान ही काळाची गरज असून,शासकीय कर्मचाऱ्यासह नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.