बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील 90 हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 74.45 कोटींची मदत मंजूर झाली आहे. मात्र मदत मिळवून देण्यासाठी राजकीय श्रेयवाद दिसून येत आहे. पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपापल्या परीने ‘ प्रेसनोट’ प्रसार माध्यमांना देऊन पाठपुराव्याला यश आल्याचा दावा केला आहे.त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्चस्वासाठी नेत्यांचा हापापलेपणा अधोरेखित होत असून, संभ्रमावस्था निर्माण केल्याचे चित्र आहे.
बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान भरपाई ची मदत मिळावी, शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळावा, कर्जमाफी मिळावी या महत्वपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर सातत्याने शासनाच्या विरोधात लढा देत आले आहेत. शिवाय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आणि पालकमंत्री यांनी सुद्धा हा प्रश्न रेटून लावला होता.आता मात्र 90 हजार अतिवृष्टीग्रस्तांना 74.45 कोटींची नुकसान भरपाई मिळणार आहे. परंतु शेतकरी हितासाठी मीच झटलो..असा युक्तिवाद राजकारणी करत आहेत. या संदर्भातील परिपत्रक महाराष्ट्र शासनाने 6 ऑगस्ट रोजी जारी केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मदत म्हणजे रविकांत तुपकर यांनी व शेतकऱ्यांनी सातत्यपूर्ण केलेल्या मागणीचा आणि पाठपुराव्याचा परिणाम आहे, असे रविकांत तुपकर म्हणतात. केंद्रीय मंत्री जाधव यांनी आमदार रायमुलकर सह
25 व 26 जून रोजी जिल्ह्यात ढगफुटीसदृश प्रचंड पाऊस झाला असता, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून हा प्रश्न मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे रेटून मदतीची मागणी केली होती. तर महिना उलटून गेल्यावर पालकमंत्री मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी केली होती.या तिघांनी शासन दरबारी अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याचे बाधित शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते.आता मात्र अतिवृष्टीग्रस्तांना मदत मंजूर झाल्याने श्रेयवादाचे तूप आपापल्या पोळीवर ओढून घेत असल्याचे दिसून येत आहे.














