बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. एकीकडे दारूचे भाव सरकारने वाढविले असून, दारू विक्रीच्या अवैध धंद्याला लगाम लावण्यात लोकप्रतिनिधी,
राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे.त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून,याचे कुणाला सोयरेसुतक दिसून येत नाही.मात्र वानखेड (ता. संग्रामपूर) येथील महिला अवैध दारू विक्री बाबत आक्रमक झाल्यात. त्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांना व्यथा सांगितली असता, तुपकरांनी थेट पोलिसांना फोन करून ही दारू विक्री बंद करण्याचे सांगत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा महापूर वाहत आहे.चढ्या भावाने दारू विक्री करून मालामाल होण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. ही अवैध दारू विक्री थांबवा यासाठी वानखेडच्या स्थानिक महिला भगिनी आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात महिला भगिनींनी रविकांत तूपकर यांना निवेदन देऊन व्यथा सांगितली. गावातील युवक व्यसनाच्या अधीन जात असून, पुरुष वर्गही व्यसनाच्या जाळ्यात अडकत आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. ही गंभीर परिस्थिती त्यांनी स्पष्टपणे मांडली. त्यांच्या अडचणींची तात्काळ दखल घेत, तूपकरांनी थेट संबंधित पोलीस अधिकारी यांना फोन करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले, अवैध दारू विकणाऱ्यांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन केले जाईल असा कडक इशाराही दिला आहे.