बुलडाणा (हॅलो बुलढाणा) ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातही बसविण्यात येत आहेत. हे मीटर नवतंत्रज्ञानावर आधारित असून तांत्रिकदृष्ट्या ते अधिक स्मार्ट स्वरूपाचे असले तरी ते प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीज वापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
प्रगतशील तंत्रज्ञानाचा वापर वीजक्षेत्रात होणे ही काळाची गरज आहे. टिवोडी मीटर मध्ये मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. शिवाय ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. त्यामुळे वीजबिलाच्या संदर्भाने होणाऱ्या ग्राहक तक्रारी कमीत कपात होणार आहे. सद्यस्थितीत कृषी वर्गवारी वगळता इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत. अकोला परिमंडलात जीनस या एजन्सीला मीटर बसविण्याचे काम देण्यात आले असून सुरुवातीच्या काळात सरकारी कार्यालये, सरकारी निवासस्थाने, मोबाईल टॉवर, नादुरुस्त मीटरच्या ठिकाणी हे टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत. तसेच नवीन वीजजोडणी देतानाही टीओडी मीटर बसविण्यात येत असून, सोलार नेट मीटरिंगसाठी ही त्याचा वापर करण्यात आला आहे. आतापर्यंत अकोला परिमंडळात १ लाख ३ हजार ४०२ मीटर बसविण्यात आले असून त्यापैकी अकोला ३४ हजार ८३६,बुलढाणा ४८ हजार ३८ आणि वाशीम जिल्ह्यात २० हजार ५२८ टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत. महावितरणच्या नव्या वीजदर प्रस्तावात ग्राहकाने वीज कधी वापरली त्या वेळेनुसार दरात सवलत देण्यात येणार आहे. टीओडी मीटर असल्याशिवाय ही सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर आवश्यकच आहे. नव्याने बसविण्यात येणारे वीजमीटर अत्याधुनिक व स्मार्ट स्वरुपाचे असले तरी ते प्री-पेड नाहीत किंवा ते बसविण्यासाठी व मीटरची किंमत म्हणून ग्राहकांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. ग्राहकाने वापरलेल्या विजेची अचूक नोंद घेऊन योग्य वीजबिल देण्यास हे मीटर उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याकामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.