बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खाकीदारी असतात. त्यांच्याचमुळे समाजात सुरक्षितता आहे. परंतु यातील काही खादाड पोलीस खाकीवर डाग लावण्यास कारणीभूत ठरतात.आज बुलढाणा बायपास रोड, चिखली येथे एका चित्रदुर्ग कर्नाटक येथील फिल्म मेकरला मलकापूर कडे जात असताना, 2 ट्राफिक पोलिसांनी वाहन थांबवून कारवाई न करण्यासाठी बाजूच्या चहाच्या दुकानाच्या पेटीएमवर 1500 रुपये टाकायला लावले त्यानंतर 3 पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करत वाहनात सरावासाठी विकत घेतलेली एअर रायफल पाहून कारवाई न करण्यासाठी 2 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल 5 ऑगस्ट च्या सकाळी साडेदहा वाजता बुलढाणा बायपास मार्ग चिखली येथून फिल्म मेकर ताज अब्दूल रहेमान रहमततुल्ला (23) रा. गांधीनगर चल्लेकेरे जि.चित्रदुर्ग कर्नाटक हे आपल्या केए 11 ए 2862 क्रमांकाच्या टवेरा वाहनाने मलकापूर कडे जात होते. दरम्यान ट्राफिक पोलीस अभय व सोबतच्या किकरे या पोलिसाने त्यांची गाडी थांबवून कारवाई न करण्यासाठी बाजूला असलेल्या चहाच्या दुकानदाराच्या पेटीएम वर 1500 रुपये टाकण्याचे सांगितले.त्यामुळे पोलिसांच्या झंझटीत न पडता ताज अब्दूल रहेमान रहमततुल्ला यांनी त्यांचे मित्र जुबेर अहेमदच्या पेटीएमवरून पैसे पाठविले.त्यानंतर
ताज अब्दूल रहेमान रहमततुल्ला गाडीने पुढे गेले असता, पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांना वाहन थांबविण्यास सांगितले आणि त्यातील 3 अनोळखी पोलिसांनी कागदपत्रे तपासून गाडीतील सरावासाठी विकत घेतलेली एअर रायफल पाहून त्यांना कारवाई न करण्यासाठी 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. एवढे पैसे नसल्याचे सांगितले असता या पोलिसांनी 50 हजार रुपयांची व्यवस्था करा अशी मागणी केली. यावेळी ताज अब्दूल रहेमान रहमततुल्ला यांना बोगस पोलीस असल्याचा संशय आल्यावर त्यांनी वेगात टवेरा वाहन पळविल्याने देऊळगाव राजा गावच्या दिशेने नेली असता सदर गाडीत बसलेल्या पोलिसांनी गाडी थांबविण्यास सांगून खाली उतरले.ताज अब्दूल रहेमान रहमततुल्ला आपली वाहन पुढे घेऊन जात असता ते घाबरल्याने त्यांची गाडी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. यावेळी 3 पोलीसांनी तेथे येऊन पैशाचा विषय केला.मात्र घटनास्थळी स्थानिक पोलीस आल्याचे पाहून या तीन पोलिसांनी सदर घटना न सांगण्याची धमकी दिली अशी तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अप. क्र. 610/2025 कलम 308(2),308(3),351(2),3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतु या प्रकरणी सदर पोलीस बोगस आहेत की खरे याबाबत अधिकारी यांनी दुजोरा दिलेला नाही.