बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सर्वत्रच सायबर अपराधांचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. दररोज कुठेना कुठेतरी सायबर फ्रॉडच्या घटना घडतच असतात. जिल्ह्यात या वर्षात आता पर्यंत महिला व फसवणूकीबाबतचे 35 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार 2025 या वर्षात सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या 12 गुन्ह्यात सायबर भामट्यांनी तब्बल 2 कोटी 3O लाख 74 हजार 686 रुपये उकळले आहेत. त्यापैकी 8 गुन्ह्यातील 1 कोटी 6 लाख 49 हजार रुपये सायबर पोलिसांनी हस्तगत करून परत केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे ठाणेदार प्रकाश सदगीर, एएसआय शकील खान, राम मुंडे, कुणाल चव्हाण, भरत जंगले, राजदीप वानखेडे, विकी खरात, क्षितिज तायडे यांनी ही कारवाई केली आहे.सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. त्यामुळे अनेकांची ऑनलाईन फसवणूक होते. हे सायबर गुन्हेगार किंवा हॅकर्स अनेकांच्या बँक डिटेल्स मिळवून आर्थिक फसवणूक करतात.सायबर गुन्हेगार लोकांशी सायकॉलॉजिकल माईंड गेम खेळतात आणि सायबर चोरी करण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे या गुन्हेगारांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आणि आपली पर्सनल माहिती चुकूनही शेअर करू नका. पर्सनल माहिती कुटुंबातील सदस्यांव्यतीरिक्त इतर कुणालाही शेअर करू नका अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.
▪️कोणत्या तक्रारी ?
हॅकिंग : एखाद्याचे शोशल मिडीया अकाउंट हॅक करून त्याचा गैरवापर करणे
फिशिंग : खोट्या लिंक्स किंवा मॅसेजद्वारे वैयक्तीक माहिती किंवा बँक डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न करणे
फेक अकाउंट: बनावट प्रोफाईल तयार करून फसवणूक करणे
▪️‘सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून आर्थिक फसवणूक केली जाते.अधिकारी असल्याचा बनाव करून आर्थिक लुबाडणूक केली जाते.त्यामुळे सोशल मीडियावर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, यातून फसवणूक टाळता येऊ शकते.’
-प्रकाश सदगीर, ठाणेदार सायबर सेल, बुलढाणा