spot_img
spot_img

कावड यात्रेतील भीषण अपघात: भरधाव दुचाकीने घेतला जीव, एक ठार – तिघे गंभीर जखमी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) 4 ऑगस्ट श्रावण सोमवारच्या पवित्र कावड यात्रेला अपघाताचा काळडोळा लागला! अजिंठा मार्गावरील पळसखेडजवळ आज पहाटे 3:30 वाजता भरधाव दुचाकीने कावडधाऱ्यांना चिरडल्याने एकजण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतक मुकेश गजानन राठोड (वय 25, रा. करवंड) हा शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचा सेवाधारी असून दोन मुलांचा पिता होता.

गुळभेली येथून काल संध्याकाळी पहिल्यांदाच बुधनेश्वर मंदिरासाठी कावड यात्रा निघाली होती. आरती करून यात्रेकरू परतीच्या मार्गावर असताना पळसखेड-नागोच्या दरम्यान भरधाव मोटरसायकल (MH28 BZ 5274) ने मुकेशसह आणखी दोन कावडधारकांना उडवले. योगेश चव्हाण आणि एक अन्य कावडधारी गंभीर जखमी झाले असून, दुचाकीस्वार ऋषिकेश काकडे आणि मनोज माळोदे हे देखील जबर जखमी आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही कावडधारीच असून थकव्यामुळे दुचाकीने घरी परतत होते.

या दुर्दैवी अपघाताने संपूर्ण गुळभेली व करवंड परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातग्रस्त सर्वांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मुकेशचा मृत्यू उपचारापूर्वीच झाला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!