बुलढाणा (हॅलो बुलडाणा) खामगाव येथील व्यापारी दुकान बंद करून घरी जात असतांना, 2 बुरखादारी गुंडांनी अग्नीशस्त्राचा धाक दाखवत व्यापाऱ्याकडून 2 लाख 80 हजाराची बॅग लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना खामगाव पोलिसांनी अटक केली आहे. गजानन यशवंत गाडेकर(35) रा.बाळापुर जि. अकोला व योगेश डिंगाबर पूरी (37) रा. शेगाव जि. बुलढाणा असे या आरोपींचे नाव आहे.
अशोक गेस्ट हाऊस जवळील उद्योजक सोहन गोपालदास चौधरी यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. 19 जुलै रोजी ते रात्री 10.30 वाजता दुकान बंद करून आपल्या एम एच 28 बी यु 6070 क्रमांकाच्या ऍक्टिव्हाने घरी परतत असताना, अज्ञात बुरखेधारक आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवर येऊन शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी खामगाव पोलीस स्टेशनला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा क्लिष्ट असताना, पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात या आरोपींना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासावरून जेरबंद केले आहे.आरोपींचा 4 दिवसाचा पीसीआर घेण्यात आला असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 60 हजार किमंतीची सुझुकी स्कुटी, 10 हजार किमतीचा 1 देशी पिस्टल व 600 रुपये किमतीचे 3 काडतूस तसेच 30 हजार रुपये किंमतीचे 2 मोबाईल असा एकुण 1,00,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खामगावचे ठाणेदार आर.एन. पवार व पथकाने केली आहे.