बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील धाड ग्रामपंचायत मध्ये जवळपास 3.5 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रिजवान सौदागर व इतर सदस्यसह ग्रामसेवकाला ग्रामपंचायत मध्ये कोंडून ठेवले आहे. जोपर्यंत आम्हाला 15 वित्त आयोगाच्या निधीचा हिशोब मिळत नाही तोपर्यंत कोणालाही ग्रा.पं. भवनाच्या बाहेर जाऊ देणार नाही,अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
धाड ग्रामपंचायत च्या सरपंच व ग्रामसेवकांनी संगणमत करून मोठ्या प्रमाणावर 15 वित्त आयोगाच्या निधीत भ्रष्टाचार केलेला आहे.प्रामुख्याने डस्टबिन खरेदी,धूर फवारणी, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य शिबिर अशा कामावर निधी काढण्यात आल्याचा आरोप माजी सरपंच रिजवान सौदागर यांनी केला आहे.या संदर्भात त्यांनी अनेक वेळा तक्रारी केलेले आहे परंतु ग्रामविकास अधिकाऱ्याकडून हिशोब दिला जात नाही.यालाच कंटाळून माजी सरपंच रिजवान सौदागर यांनी आपल्या समर्थक ग्रामपंचायत सदस्यासह ग्राम विकास अधिकाऱ्याला आज 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपासून ग्रामपंचायतच्या इमारतीत कोंडून ठेवले आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते. त्यामुळे प्रशासनात एकाच खळबळ उडालेली आहे. जोपर्यंत निधीचा हिशोब मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. या पुढे काय होणार हे येणारी वेळ सांगणार आहे.