बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नियम धाब्यावर बसून कामकाज करणाऱ्या जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांचे बियाणे, खते व औषधी परवाने असे एकूण 93 परवाने निलंबित करण्यात आले असून बियाणे, खते व औषधी असे एकूण 72 परवाने रद्द करण्यात आले आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची व बियाण्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. कृत्रिम खतटंचाई करणाऱ्यांवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर कारवाईचा इशारा दिला होता. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्राची कृषी विभागाच्या पथकांकडून तपासणी केली जात आहे. त्यात तपासणी त्रुटी आढळलेल्या कृषी सेवा केंद्र चालकांचे परवाने रद्द व निलंबित करण्यात आले आहे. प्रो. प्रा.श्रीमती सविता दिलीप उगले, पराग शेतकरी कृषि सेवा केंद्र धाड यांनी शेतकऱ्यास मुदत बाह्य कीटकनाशके व बियाणे तसेच जादा दराने खत विक्री केल्यामुळे गणेश आप्पासाहेब सावंत, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी केलेल्या तपासणी अहवालानुसार त्यांचे बियाणे, खते व कीटकनाशके परवाने निलंबित करण्यात आले आहे. तसेच खत विक्री दरम्यान झालेल्या अनियमिततेमुळे मे.वैभव कृषि सेवा केंद्र, रायपुर व मे.साई कृषि सेवा केंद्र पांगरी तालुका बुलढाणा यांचे खताचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 93 परवाने निलंबित करण्यात आले असून 72 परवाने रद्द करण्यात आले आहे. खरीप हंगामात खते, बी-बियाणे, कीटकनाशकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात असून कृषि सेवा केंद्राची तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान जादा दराने किंवा बोगस निविष्ठा विक्री केल्यास अश्या कृषि सेवा केंद्रावर कार्यवाही सुरु राहणार आहे. असे परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी सांगितले.