शेगाव (हॅलो बुलडाणा) कपाळी केशरी गंध, खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ, मृदंग आणि मुखी श्री गजाननाचा अखंड जयघोष करीत आषाढी यात्रेसाठी शेगावातून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी परतून माहेरी शेगावच्या वाटेवर आलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्वागत केले.
विदर्भाची पंढरी म्हणून शेगावची श्री संत गजानन महाराजांची ओळख आहे. श्रींची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाते. ही पालखी परतीच्या प्रवासावर असून, खामगाव येथे शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पालखीचे पहाटे शेगावकडे म्हणजेच माहेरी प्रस्थान होते. यावेळी राज्यभरातील भाविकांची गर्दी होती. पालखीसोबत लाखों भाविक शेगावला जातात. दरम्यान शेगांव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी वारकऱ्यांसह पालखीवर पुष्प टाकून स्वागत केले. तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभू द्या, राज्यसह राज्यातील शेतकऱ्यांवर कुठलेही संकट येऊ देऊ नये, अशी प्रार्थना मंत्री आकाश कुंडकर यांनी केली आहे. या अध्यात्मक प्रसंगी
‘गण..गण.. गणात बोते’ च्या अखंड जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. टाळ मृदंगाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता.
▪️५६ पेक्षा जास्त वर्षांची अखंड परंपरा!
संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याला ५६ पेक्षा अधिक वर्षांची अखंड परंपरा आहे. शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात एकूण ७०० वारकऱ्यांचा समावेश असतो. आता तो वाढला आहे. शेगाव ते पंढरपूर असे ७५० किलोमीटर अंतर पार करत आणि ३३ ठिकाणी मुक्काम करत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आषाढीच्या पूर्वी पंढरपुरात पोहोचतो. अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे.
▪️भगवी पताका अखंड खांद्यावरच!
गजानन महाराजांच्या दिंडी सोहळ्यातील सेवेकऱ्यांनी संपूर्ण वारी मार्गावर फक्त आणि फक्त हरिनामाचा गजर करण्याचा वर्षानुवर्ष दंडक आहे. वारकरी पताका घेतलेल्या सेवेकऱ्यांकडून भगवी पताका जमिनीला लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याचा नियम आहे.