खामगाव (हॅलो बुलढाणा) अलीकडे वासनांधता वाढत असून महिला सुरक्षिततेचा मुद्दा एरणीवर आला आहे.दरम्यान महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयांच्या निकालांचेही स्वागत होत आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला खामगाव जलद गती न्यायालयाचे न्यायाधीश बिडवई यांनी 20 वर्षाची सक्तमजूरी व 40 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 1 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा देखील ठोठावली आहे. कैलास गोपाल निमकर्डे खामगाव असे या नराधमाचे नाव आहे.
शहरातील एका भागात ही घटना सन 2023 मध्ये समोर आली होती. पिडीत अल्पवयीन 11 वर्षीय मुलगी शौचास जात असतांना नराधम
कैलास गोपाल निमकर्डे वय 52 याने तिला त्याच्या घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला. या घटनेची हकीकत मुलीने आईला सांगितली व मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपी विरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पूर्ण झाल्यावर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. साक्षी व पुराव्याच्या आधारे सरकारी पक्षाने केलेल्या युक्तिवादामुळे आरोपी दोषी म्हणून सिद्ध झाला. दरम्यान न्यायालयाने नराधाम कैलास गोपाल निमकर्डे याला कलम 4,6,8 अंतर्गत 20 वर्षाची सक्त मजूरीची व प्रत्येकी 10 हजार रुपये दंड कलम 342 अंतर्गत 6 महिन्यांची सक्तमजूरी व 5 हजाराचा दंड अशा एकुण 40 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. यातील 25 हजार रुपये पिडीतेला देण्यात यावे असेही आदेशात नमूद केले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षा तर्फे ॲड. सुनील इंगळे तर फिर्यादीच्या बाजूने ॲड.गणेश इंगळे व ॲड.निलेश इंगळे यांनी युक्तिवाद केला.