बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काल 29 जुलै रोजी नागपंचमीला नागाची पूजा करून सर्वत्र आपआपल्या इच्छापूर्तीचे नागदेवतेला साकडे घालण्यात आले आणि 30 जुलैच्या पहाटे 5 वाजता बुलढाणा तालुक्यातील माळ विहीर येथे संतोष काळे यांच्या घरी 6 फुट लांबीच्या विषारी कोब्रा नागाने काळे कुटुंबियांची भांबेरी उडविली होती, नागाच्या फुत्काराने गोळा झालेल्या शेजाऱ्यांच्या अंगावर देखील शहारे आले. दरम्यान सर्पमित्र श्रीराम रसाळ यांच्या सेवातत्परतेमुळे नाग बरणीबंद झाल्याने काळे कुटुंबीयासह उपस्थितांचा जिव भांड्यात पडला.
काल 29 जुलै रोजी नागपंचमीनिमित्त सर्वत्र शिवालयात भाविकांची गर्दी उसळली होती. भाविकांनी मनोभावे नागदेवतेची परंपरेनुसार पूजा-अर्चा केली.याच नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी 30 जुलै रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील माळविहीर गावातील संतोष काळे यांच्या घरात कोब्रा नाग फुत्कारत असल्याने डोळ्यावरची झापड काढून बघितले असता, काळे कुटुंबियांची घाबरगुंडी उडाली. तब्बल 6 फुट लांबीचा नाग घरातील अडगळीत पडलेल्या साहित्या आड दडून बसला होता. नागाचा फुस्स ss फुस्स असा फुत्कार काळजाचे ठोके चुकवित होता. काहीच वेळात शेजारी गोळा झाले. कुणी म्हणाले ‘या विषारी नागाला मारा..’तर कुणी म्हणाले सर्पमित्रांना फोन लावा..’ मात्र कोब्रा नागाचे रौद्र रूप पाहून त्याच्या जवळ जाण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही. अखेर पहाटे 5.10 वाजता सर्पमित्र एस.बी. रसाळ यांच्या भ्रमणध्वनीची घंटा वाजली अन् ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. नागाला बरणीबंद करण्यात त्यांना वेळ लागला नाही. नागाला पकडून त्यांनी उपस्थितांना ‘ ‘नेहमीच नागपंचमी असते, कोणत्याही वन्यजिवाला मारू नये,असे सांगत सापाविषयी जागर केला. कुठेही साप निघाला तर मला संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.