चिखली (हॅलो बुलडाणा) दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक महेश दाभाडे यांची तडका फडकी बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्यालयात भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराची चर्चा सुरू आहे.त्याच कारणास्तव यांची बदली झाली का?अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे
दुय्यम निबंधक कार्यालये ही नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गत कार्यरत असतात. यांचे कामकाज नोंदणी अधिनियम 1908, महाराष्ट्र नोंदणी नियम 1961, आणि महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 नुसार चालते. या कार्यालयांद्वारे दस्त नोंदणी, प्रमाणित नकला देणे, आणि इतर सेवा पुरवल्या जातात. चिखली येथील कार्यालयही याच रचनेचा भाग आहे. परंतु, चिखलीच्या कार्यालयात या सेवांच्या नावाखाली नागरिकांची लूट होत असल्याची ओरड सुरू होती. याच पार्श्वभूमीवर, दुय्यम निबंधक महेश दाभाडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, याबाबत परिसरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. या कार्यालयातील कामकाजाच्या पद्धती आणि अनाधिकृत व्यक्तींकडून होणारी पैशाची मागणी यामुळे कार्यालयाची प्रतिष्ठा धुळीला मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. शासकीय शुल्काचे दरपत्रक लावलेले नाही. याचा गैरफायदा घेत कार्यालयात अनधिकृतपणे काम करणारे काही व्यक्ती सामान्य नागरिकांकडून अवास्तव रकमेची मागणी करतात. विशेष म्हणजे, दस्तऐवज पूर्ण असतानाही नागरिकांना पैशाची मागणी केली जाते. या अनधिकृत व्यक्तींना कार्यालयातील अधिकृत कर्मचारीही विरोध करत नाहीत, कारण यातून मिळणारा पैसा सर्वांच्या खिशात वाटला जात असल्याचीहीचर्चा आहे.