खामगाव (हॅलो बुलडाणा) खामगाव शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी महिला कॉलेजमध्ये लाचखोरीचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. निवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीवेतनाच्या नावाखाली तब्बल दोन लाख रुपये उकळल्याचा आरोप कॉलेजमधील कर्मचारी जयेश चंद्रकांत नागडा याच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला ही शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख यांची आई असूनही तिला वारंवार चकरा माराव्या लागल्या.या कर्मचाऱ्याने आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपये घेतले असून, अजून २५ ते ३० हजारांची मागणी करत असल्याची माहिती मिळाली आहे. एवढेच नव्हे तर पैशांच्या मागणीला कंटाळून संबंधित महिलेला थेट कॉलेजच्या आवारातून बाहेर काढण्यात आले, ही बाब धक्कादायक आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे व शहरप्रमुख चेतन ठोंबरे यांनी तत्काळ कॉलेज गाठले. त्यांनी नागडा याला ‘शिवसेना स्टाईल’ने चोप दिला आणि जाब विचारला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
शिक्षण संस्थेतील अशा प्रकारच्या लाचखोरीच्या घटना म्हणजे नीतिमत्तेचा पूर्ण अधःपात आहे. निवृत्तीवेतन हा कर्मचारीचा हक्क असून त्यासाठी पैसे उकळले जाणे हा गुन्हाच आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी संतप्त मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.