बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘श्रावण मासी हर्ष मानसी’असे कवितेमध्ये केलेले श्रावणाचे वर्णन खरचं लोभसवाणे असते. दिवसात मस्त पाऊस पडतो आणि चहुबाजूनी धरती हिरवळीने नटलेली असते. अशा सुंदर आणि आल्हाददायक वातावरणाचा श्रावण सर्वांनाच हवाहवासा वाटतो. आज श्रावण महीना सुरु झाला आहे. आषाढामधील अमावस्येनंतर श्रावण महिना सुरु होतो. महाराष्ट्रामध्ये मराठी पंचांगात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे.श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून, या महिन्यात उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते. मराठी पंचांगानुसार आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही काल 24 जुलैला झाली. त्यानंतर 25 जुलै म्हणजे आज शुक्रवारपासून श्रावण मास सुरु होत आहे. तर 23 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना सुरु असणार आहे.
श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात. श्रावण महिन्यातील सोमवार “श्रावणी सोमवार” म्हणून ओळखले जातात. या दिवशी शंकराची विशेष पूजा केली जाते. यंदाच्या श्रावणात 4 श्रावणी सोमवारचे व्रत आहेत. या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे. याच श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजेच मंगळागौरी तिथीसुद्धा असते. यंदा पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला असून चौथा सोमवार 18 ऑगस्टला आहे. श्रावणी सोमवारी महादेवाला त्या त्या दिवशी ते ते धान्य अर्पण केले जाते.
▪️ शिवामूठ..
पहिला सोमवार – 28 जुलै 2025 – शिवामूठ – तांदूळ
दुसरा सोमवार – 4 ऑगस्ट 2025 – शिवामूठ – तीळ
तिसरा सोमवार – 11 ऑगस्ट 2025 शिवामूठ – मूग
चौथा सोमवार – 18 ऑगस्ट 2025 – शिवामूठ – जव
▪️पौराणिक मान्यता!
मान्यतेनुसार श्रावणात व्रत केल्यामुळे आपले भविष्य खूप चांगले होते. भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते असा समज आहे. या श्रावण महिन्यात केवळ सोमवारीच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात. श्रावणात विविध सणांची सुद्धा रेलचेल असते.श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी,रक्षाबंधन, पिठोरी अमावस्या, मंगळागौर अश्या विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात. श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते असा समज आहे. श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे.विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशा धारणा आहे.