जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील राजकारणात एका महत्त्वपूर्ण घडामोडीची नोंद झाली. आ. संजय कुटे यांच्या मतदारसंघातील माजी सैनिक वसंत उत्तमराव मिरगे आणि त्यांच्या सोबत असलेल्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा येथे करण्यात आले होते. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व युवकांचे स्वागत केले. “शिवसेना ही सामान्य जनतेच्या अधिकारांची चळवळ आहे. नव्याने प्रवेश केलेल्या युवकांनी निष्ठेने आणि जोमाने कामाला लागून शिवसेनेचा विचार घराघरात पोहचवावा. हा केवळ पक्षप्रवेश नाही, तर सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत पावित्र्याने उडी घेणारी एक शपथ आहे.” असे यावेळी गायकवाड म्हणाले.पक्षप्रवेश केलेले माजी सैनिक वसंत मिरगे हे दिवंगत भाजपा नेते स्व. उत्तमराव मिरगे यांचे पुत्र असून, सैनिकी सेवेत देशासाठी योगदान दिल्यानंतर आता जनसेवेच्या माध्यमातून जनतेसाठी काम करण्याचा नवा अध्याय त्यांनी सुरू केला आहे. ” आ.संजय गायकवाडांचे कार्य, त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि युवकांप्रती असलेली आत्मीयता पाहूनच हा निर्णय घेतला आहे,” असे वसंत मिरगे यांनी भावनिक शब्दांत सांगितले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य व युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख अशोक टावरी, जळगाव जामोद तालुकाप्रमुख अजय पारस्कर यांच्यासह युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच वसंतराव मिरगे मित्र परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.