बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक! आज दिनांक 24 जुलै 2025 रोजी बुलढाणा-खामगाव महामार्गावरील वरवंड फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार चक्काजाम आंदोलन छेडले. जिल्हाप्रमुख वैभव राजे मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाप्रमुख गणेश काकडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले.शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी, अपंगांना थेट अनुदान, शेतमालाला त्वरित भाव, तसेच बी-बियाणे व खतांच्या वाढत्या किमती तातडीने कमी कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी काही वेळ महामार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प केली.
पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात करत आंदोलन शांततेत रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आक्रमकच राहिले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत तालुकाप्रमुख गणेश काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली.प्रहार जनशक्ती पक्षाने स्पष्ट इशारा दिला की, “जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही!”
या आंदोलनात राम खरात, अशोक चावरे, मोहन शिंदे, गोविंद चावरे, शिवराज राठोड, गोपाल पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, मजूर आणि दिव्यांग सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.