बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ इमरान खान) दत्तपूर फाट्याजवळील एका शेतात माजी तंटामुक्ती अध्यक्ष जुनेद खान यांच्यावर मण्यार जातीच्या विषारी सापाने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली.
जुनेद खान हे आपल्या काही नातेवाईकांसोबत महिशी येथील शेतात वीज पंखा (फॅन) लावण्यासाठी गेले होते. फॅन लावण्याच्या कामात ते व्यस्त असताना अचानक एका मण्यार सर्पाने त्यांच्या पायाला लपेटले आणि दंश केला. या जीवघेण्या प्रसंगाने काही क्षणांसाठी गोंधळ उडाला. नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.ही घटना घडलेले ठिकाण म्हणजेच दत्तपूर फाट्याजवळील शेत, हे सध्या शेतीसाठी वापरात असून, अनेक शेतकरी रात्रीच्या वेळीही कामे करत आहेत. अश्यावेळी सापासारख्या प्राण्यांचा धोका अनेक पटीने वाढतो.
टीम ‘हॅलो बुलढाणा’ तर्फे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहेत, मात्र सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. रात्रीच्या वेळी शेतात काम करताना पुरेशा प्रकाशाची व्यवस्था, पायाला बूट वापरणे, आणि आजूबाजूचा नीट निरीक्षण करणे गरजेचे आहे.