बुलढाणा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील घाटाखाली असलेल्या मोहेगावात अतिक्रमण काढणीच्या कारवाईदरम्यान भीषण गोंधळ उडाला. प्रशासन आणि पोलीस कर्मचारी अतिक्रमण हटवण्यासाठी पोहोचले असता स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक होत पोलिसांवर थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात SRPF जवान नंदकिशोर उदावणे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेश मानकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मोहेगावमधील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा चिघळलेला असून, याआधी सुद्धा गावकरी बोरा (वस्ती विस्तार) मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनासाठी आले होते. मात्र आजची घटना प्रशासनासाठी चिंतेची घंटा ठरत आहे. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईचा ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत अचानक हल्ला केल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली.
या हल्ल्यात SRPF जवानासह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, काहींवर मोताळा येथे उपचार सुरू आहेत. पोलीस यंत्रणेला रोषाचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी या घटनेनंतर ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.पोलिसांवर हल्ला ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.