बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भटक्या कुत्र्यांची दहशत जिल्ह्यात एवढी वाढली आहे की,1 एप्रिल ते 30 जून दरम्यान 2,325 जणांना श्वानदंश झाला आहे.
उपद्रवी भटकी कुत्री आता माणसांवरही हल्ले करत आहेत.जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. तब्बल 2,325 झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने घेतली आहे. ग्रामीण भागात कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने श्वानदंशाचे प्रकार वाढलेत. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यात श्वानांना सहज खाद्य उपलब्ध होते. ग्रामीण भागात तर जागोजागी असा कचरा पडलेला असतो. त्यामुळे श्वानांची संख्या वाढत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनांना आडवे आल्याने अपघात तर होतातच; शिवाय श्वानदंशाच्या घटनाही वाढत आहेत. नागरिकांवर हल्ला करून त्यांना चावा घेण्याचे प्रकार वाढले आहेत. गावातील सरकारी दवाखान्यांत रोज असे चार पाच रुग्ण येत असल्याचे येथील वैद्यकिय अधिकारी सांगतात.
▪️समस्यांचा ढिगारा!
गावातील कचऱ्याची समस्या, लोकसंख्येचा रेटा, निर्बिजीकरणाच्या प्रक्रियेतील अडथळे, औषधोपचारांची वानवा, उघड्यावर पडलेले अन्नपदार्थ यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे. या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याकडे शहरात नगरपालिकेचे तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष झाले आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने या समस्येत वाढ झाली आहे. नगर परिषदेकडे किंवा ग्रामपंचायतींकडे बऱ्याचदा कुत्र्यांना पकडण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नसते.त्यामुळे हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. शहरी भागातही कुत्र्यांचा त्रास वाढला आहे.