लोणार (हॅलो बुलडाणा) लहरी पाऊस गेल्या दहा-बारा दिवसापासून रूसलेला होता परंतु काल रात्रीपासून पहाटेपर्यंत तो वक्रदृष्टीने असा बरसला की,
त्याने पुन्हा शेतकऱ्यांसह अनेकांना संकटात आणले.पावसाने अनेकांच्या घरात शिरकाव केल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला असून,शेकडो हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेली तर पेरणी उखडल्याने दुबार, तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
बुलढाणासह जिल्ह्यात काल रात्रभर पावसाने लोणार,मेहकर, खामगाव,शेगाव, सिंखेडराजा, चिखली या तालुक्यांना चांगलेच धुतले आहे.लोणार तालुक्यातील धरणे,नदी नाल्यांना पूर आला असून, हाहाकार उडाला आहे.रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने लोणार तालुका जलमय झाला.विजांचा गडगडाट उरात धडकी भरवणारा होता.नदी-नाल्यांच्या पुलावरून व नदी शेजारील सर्व शेती पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.शहरातील बऱ्याच कॉलनीमधील घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.येथील महावितरण कार्यालयातही पाण्याने शिरकाव केला.