चिखली (हॅलो बुलडाणा) साफसफाईचा तब्बल 2 कोटी 81 लाखाचा ठेका घेऊनही नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणाने शहरात अस्वच्छता नांदत असल्याचे घाणेरडे चित्र निर्माण झाले आहे.शिवसेना संलग्नित युवा सेनेच्या वतीने याबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे.
पावसाळ्या पूर्वीच्या साफसफाईकडे नगर पालीकेने दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील अनेक वार्डात असलेल्या सर्व्हिस नाल्या तुडूंब भरल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र दुर्गंंधी पसरली.ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चिखली शहरात लोकसंख्या वाढत असून वाढत्या लोकसंख्येमुळे शहर स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु पालिका पदाधिकारी राजकीय फायद्याच्या दृष्टीने काम करतात. त्यामुळे पालिका अधिकारी व कर्मचार्यांवरील त्याचा धाक कमी झाला आहे. कर्मचारी फक्त अर्थपूर्ण कामाकडे लक्ष देत असल्यामुळे नागरिकांना सुखसुविधा मिळणे कठिण झाले आहे. कचरा जमा करण्यासाठी शहरात फिरणारी घंटागाडी महिना-पंधरादिवसातून कधी कधी दिसते. त्यामुळे अनेक वार्डातील विविध चौकात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. सफाई कामगारांकडे ठेकेदार तसेच पालिका पदाधिकार्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे अनेक वार्डातील सर्व्हिस नाल्या तुडुंब भरल्या आहेत. या नाल्यात घाण कुजत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंंधी पसरून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय अंतर्गंंत रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. काही जुन्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तर नवीन रस्त्यांच्या दर्जा सुमार असल्यामुळे ठिकठिकाणी घाण पाणी साचत आहे. त्याचाही परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेली झाडे-झुडपी तोडण्यात न आल्यामुळे कचरा अटकून घाण पाणी रस्त्यावर तुंबत आहे. त्यावर नागरिक व विद्यार्थ्यांंची ये-जा असते. वाहनेही वेगाने धावत असतात. यामुळे घाण पाणी अंगावर उडते. त्याचाही परिणाम आरोग्यावर होत आहे.काही दिवसांपूर्वी डफडे बजाओ आंदोलन केल्यानंतरही प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडली नाही, त्यामुळे सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.