बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कॅन्टीन प्रकरण मारहाण म्हणा की,आणखी काही? आम.संजय गायकवाड सतत आक्रमक असतात. शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा ते अडचणीत आणताहेत.काही वेळा त्यांनी माफी सुद्धा मागितली. दरम्यान त्यांच्या लुंगी राड्यावरून विरोधकांनी मंत्रालयात आंदोलन केल्याने त्यांची पुन्हा जीभ घसरली. त्यांनी चक्क अनील परब यांना रानडूक्कर असे संबोधले आहे.
आपल्या विविध वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा जीभ घसरली आहे. मंत्रालयात चड्डी बनियन टोळी संदर्भात विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर त्यांना समाज माध्यमांनी छेडले असता त्यांनी अनिल परबांवर जोरदार टीका केली ते म्हणाले की,उद्धव ठाकरे जेव्हा लोणार मध्ये आले होते तेव्हा चड्डी बनियानचा आरोप करणाऱ्या आदित्यला मी चड्डी बनियनमध्ये वर घेऊन गेलो होतो. कारण उद्धवला त्याला घेऊन चढता येत नव्हतं, दुसरा आमचा तो अनिल परब चड्डी बनियान वर तो मला नाव ठेवतो, परंतु ज्या दिवशी ते मंत्री होते मी त्यांच्या घरी गेलो होतो ते नाश्ता करीत होते. ते सुद्धा मी जशा अवस्थेमध्ये होतो तसेच होते. किंबहुना त्यांच्या अंगात बनियन पण नव्हतं, आणि आम्ही तरी बनियन मध्ये माणसं दिसतो. तो तर रानडुक्कर दिसत होता. त्याला आम्हाला बोलायचं काय अधिकार आहे. अश्या शब्दात शिवसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिले. ते गुरुवारी शेगावात बोलत होते.