बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गत 2022 -23 या वर्षात गाय वर्ग जनावरांमध्ये होणारा लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. यंदाही लम्पी आजाराने काही भागात जनावरे दगावल्याचा पशुपालकांचा आरोप असून सदर जनावरांचे 15 नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.दरम्यान लम्पी आजाराला वेसण घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम गावोगावी राबविण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 वर्षा पूर्वी जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याने, शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. आता लम्पीची धास्ती पशुपालकांना सतावत असून दुधाचे दर घसरले असताना खाद्याचे वाढते दर आणि त्यातच पशुधनावर आजारांचे संकट यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. काही ठिकाणी जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे जनावरांच्या संगोपनात अडथळे निर्माण होत असून, पशुसंवर्धन विभागाकडून सतत जनजागृती केली जात आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार असून उपचारानंतर बरा होतो. त्यामुळे घाबरून न जाता वेळीच योग्य उपचार करून पशुधनाचे संरक्षण करणे गरजेचे आहे.सध्या पावसाळा सुरू असून गुरांच्या गोठ्यात गोचीड, गोमाशाचे निर्मुलन करून गोठा स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचे व उपाय योजना राबविण्यात बाबत 129 पशुवैद्यकीय संस्थेमार्फत सर्व ग्रामपंचायत सचिव यांना कळविण्यात आले आहे.
▪️जिल्ह्यातील 310000 जनावरांचे लसीकरण!
2024 च्या पशुगणनेनुसार
360815 गायवर्ग (गाय,बैल, वासरे नर व मादी) असे पशुधन आहे. त्यापैकी आज पर्यंत 129 पशुवैद्यकीय संस्थे अंतर्गत 1337 गावांमध्ये वाटप केलेल्या 316500 लसमात्रा उपलब्ध करण्यात आल्या. त्यापैकी 310000 जनावरांना लम्पी सदृश्य आजार होऊ नये म्हणून लसीकरण करण्यात आले आहे.
सिंदखेडराजा राजा – 03, देऊळगाव राजा – 10,मलकापूर -01 चिखली -01 असे एकूण 15 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.रिपोर्ट आल्यानंतरच जनावरांचा मृत्यू लम्पी आजाराने झाला की इतर कोणत्या आजाराने हे स्पष्ट होईल.
-डॉ.अमितकुमार दुबे,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,बुलढाणा