चिखली (हॅलो बुलडाणा) तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. सध्या या पिकावर हुमणी अळीचा प्रादृर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. चिखली तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांची सोयाबीन या अळीमुळे धोक्यात आले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. उगवून आलेले सोयाबीन पिक संकटात सापडले आहे त्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. सरकारने नुसकानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपपाईसह दुबार पेरणीसाठी मदत करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने चिखली तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन क्रांतिकारीच्या पदाधिकाऱ्यांनी आज 16 जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी यांना दिले.
चिखली तालुक्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असून सोयाबीन हेच प्रमुख या तालुक्याचे आहे. शेतकऱ्यांची नगदी पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते परंतु हुमणी अळीच्या आक्रमणामुळे सध्या सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. तालुक्यात सर्वत्र शेतांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हुमणी कीड हि बहुभक्षी असून तिच्या प्रादुर्भावामुळे झाडांची पाने पिवळी पडत आहे.तर काही शेतात मोठ्या प्रमाणात झाडे सुकताना दिसत आहे. झाडे उपटून तपसल्यास त्यांची मुळे कुरतडलेली दिसतात. तसेच झाडाच्या मुळांजवळ २-३ इंच खोलीवर अळ्या आढळून येत असल्याने प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही या अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांनी अगोदरच विविध बँकांचे कर्ज घेऊन पेरणी केली आहे.त्यात उशिरा आलेला पाऊस, दुबार पेरणीचे संकट आणि आता पिकांवर विविध रोगासह हुमणी अळीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन पिक पूर्णपुणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. शेतकऱ्याचा यावर्षीचा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागामार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते भगवानराव मोरे , राम अंभोरे , छोटू झगरे, कार्तिक खेडेकर , सुधाकर तायडे ,चेतन शिंदे , आदित्य उन्हाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.