बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नगर परिषदेमध्ये चार ते पावणे पाच वर्षापासून निवडणूक झालेली नसताना आणि एकही सदस्य किंवा पदाधिकारी कार्यरत नसताना, प्रशासकीय अधिकारी नागरिकांची कामे चांगली करत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कायमस्वरूपी प्रशासकीय अधिकारी ठेवावे व सदस्य हे पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी जनसामान्य माणूस अन्याय अत्याचार कृती समितीने जिल्हाधिकारी यांना केली आहे.
बुलढाणा शहरात गेल्या चार ते पावणे पाच वर्षापासून नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे सदस्य किंवा पदाधिकारी कार्यरत नाहीत.नगर परिषदेचे कार्य हे प्रशासकीय अधिकारीच पार पाडत आहेत. जनतेची कामे देखील चांगल्या रीतीने पार पाडली जात असून, कोणत्याही घटकाला मूलभूत गरजांपासून वंचित ठेवल्या जात नाही.त्यामुळे कोणताही सदस्य नसताना एवढी चांगली कामे होत असेल तर सदस्य कशाला हवेत? असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. नगरपरिषदेत कोणतेही नागरिकाची समस्या किंवा तक्रार आली तर अवघ्या पाच मिनिटात समस्यांचे निराकरण होते. तर कशाला सदस्य पाहिजे ? त्यामुळे निवडणुका न घेता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच जनसेवक ही पदवी बहाल करावी आणि निवडणुकीवर होणारा हजारो कोटींचा खर्च शासनाने वाचवावा,अशी मागणी जनसामान्य माणूस अन्याय अत्याचार कृती समिती बुलढाणाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून आज 15 जुलै रोजी केली आहे.