बुलडाणा (हॅलो बुलडाणा) स्वच्छ हवा, डोंगरदऱ्यांचं सौंदर्य, आणि नयनरम्य निसर्ग यामुळे ओळखलं जाणारं बुलडाणा शहर सध्या भयंकर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलं आहे. आज सकाळी राजुर घाटातील बालाजी मंदिरासमोर तब्बल ५ पोत्यांमध्ये भरलेले कोमडीचे पंख आणि मांसाचे तुकडे रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले असल्याचं उघडकीस आलं.
या प्रकारामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, त्यावर माशांचा उपद्रव वाढल्याने आजूबाजूच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यामुळे यामध्ये अळ्या पडण्याची शक्यता असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.सकाळी मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, तसेच पोलिस भरतीची तयारी करणारे युवक-युवती रोज या भागात येत असतात. यांचा आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. शिवाय, मांसाचा वास जंगलातील हिंस्र प्राण्यांना आकर्षित करून ते शहराच्या दिशेने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बुलडाण्याच्या निसर्गमोहक राजुर घाटात असा अमानवी व असंवेदनशील प्रकार घडणं हे अत्यंत निंदनीय आहे. यामागे कोण आहे, हे शोधून त्यांच्यावर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.