बुलढाणा (हॅलो बुलडाणा) रस्ते बांधकामात कमिशनचे समीकरण असतेच हे सर्वश्रुत आहे.शहरातील नगर परिषदेच्या हद्दीतील गोरक्षण वाडी, श्याम टॉकीज दरम्यानचे रस्तेकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने केला असून, कॉलिटी कंट्रोलच्या तपासणीची मागणी करण्यात आली आहे.या संदर्भातील निवेदन आज 14 जुलैला संबंधितांना देण्यात आले आहे.
रस्ते विकास वाहिनी समजले जातात.शासन रस्त्यांसाठी मुबलक पैसा देतो.परंतु ठेकेदार किंवा संबंधित यंत्रणा किंवा लोकप्रतिनिधी यात गौडबंगाल करून रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविण्याचे काम करीत असल्याचा अनुभव सर्वश्रुत आहे.बुलढाणा शहरातील गोरक्षण वाडी, श्याम टॉकीज दरम्यानचे सिमेंट काँक्रिटीकरणचे रस्तेकाम पूर्ण झाले आहे,मात्र यात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप होत आहे. या कामांमध्ये माती मिश्रित रेती, स्वस्त सिमेंट आणि हलक्या दर्जाचे लोखंड वापरण्यात येऊन मोठमोठ्या अंतराने लोखंडी जाळी बसविण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.नवीन रस्ता तयार करत असताना, रस्त्याखालील डांबर व काँक्रीट काढणे गरजेचे असते, रस्त्यावर रोड रोलर फिरविण्याची गरज असते मात्र संबंधित ठेकेदाराने या कामाला बगल देत तसाच सिमेंट काँक्रीटीकरणाचा तकलादू रस्ता केला.त्यामुळे या रस्त्याची अकोला क्वालिटी कंट्रोल कडून तपासणी करण्यात यावी,सदर अहवाल आल्यानंतरच ठेकेदाराची बिले अदा करण्यात यावी,अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे शहराध्यक्ष करण अर्जुन बेंडवाल यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.