बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा येथील मिर्झा नगरात हिस्त्र जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाली असून तातडीने बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने उपवनसंरक्षक यांना देण्यात आले. या निवेदनाची त्वरित दखल घेत उपवनसंरक्षक यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याचे आदेश दिले आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने मिर्झा नगर परिसरात पिंजरे बसविले, यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ‘
शहरातील मिर्झा नगर हा भाग डोंगराच्या कडेला आहे. त्यामुळे या भागात नेहमीच जंगली प्राण्यांचा वावर दिसून येतो. गेल्या दोन महिन्यापासून बिबट्या,अस्वल,रान डुकरांचा वावर अधिक प्रमाणात आढळून येत आहे. संध्याकाळ झाली की बिबटे, अस्वल व इतर प्राणी मानव वस्तीमध्ये शिरून कुत्रे,डुकरे यांची शिकार करताना वारंवार दिसत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संध्याकाळ झाली की घराच्या बाहेर निघणे मुश्किल झाले आहे. या भागात लहान मुलांची शाळा आहे , मदरसा आहे. परंतु मुलांना अगदी सकाळी व सायंकाळी घरावर पाठवणे धोक्याचे झाले असल्याने पालक चिंतेत आहेत.स्थानिक नागरिकांनी या संदर्भात यापूर्वी देखील वनविभागाला या प्रकाराबाबत माहिती देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती, परंतु वन विभागाकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मिर्झा नगर येथील नागरिकांनी युवा नेते रविकांत तुपकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी रविकांत तुपकर यांनी सर्वांची समस्या जाणून घेतल्यानंतर ‘क्रांतिकारी’चे अमोल मोरे व टीम यांना सदर नागरिकांना घेऊन उपवनसंरक्षक यांची भेट घेण्याचे सांगितले. त्यानुसार अमोल मोरे व टीमने तसेच मिर्झा नगर येथील नागरिकांनी उपवनसंरक्षक अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेत वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झा नगर परिसरात पिंजरा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार वन कर्मचाऱ्यां कडून संध्याकाळ पर्यंत पिंजरे लावण्यात आले.
यामुळे या भागातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून भीतीचे वातावरण देखील निवळले आहे. निवेदन देताना ‘क्रांतिकारी’ चे अमोल मोरे, शत्रुघ्न तुपकर, मिर्झा नगर येथील नागरिक राजा खान,साद खान,ओसामाभाई,अरमान भाई,कामरान भाई,अली भाई, रिहान भाई, इशाज भाई, शानबाज इ .कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.