बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरासह जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे वावरणारे मोकाट कुत्रे वाहनांवर झेपावतात. जाणाऱ्या – येणाऱ्या नागरीकांसह शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या पाठीमागे लागतात.दररोज कुठे ना कुठे कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडताहेत.
जिल्ह्यात एका महिन्यात 699 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आकडा आहे. परिणामी या भटक्या कुत्र्यांना आवरणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असून नगरपालिके विरोधात रोष व्यक्त होतोय.
नगरपालिकेकडून दरवर्षी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणा साठी लाखो रुपयांची तरतूद केली जाते. परंतु निर्बीजीकरण करण्यात नगर पालिका उदासीन आहे.उघड्यावरच मटनांची दुकाने असल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. 9 जुलै रोजी एका पिसाळलेल्या कुत्र्याने येथील हिरोळे पेट्रोल समोर एका व्यक्तीवर हल्ला चढवला. याच कुत्र्याने 14 जणांना चावा घेतल्याची माहिती पुढे आली. मोकाट कुत्र्यांमुळे जखमी होणाऱ्या नागरिकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यासह शहरातील बहुतांश भागात मोकाट कुत्र्यांचे जत्थेच जत्थे फिरत असतात. हे कुत्रे अचानक हल्ले करीत असल्याने महिलांसह, अबालवृध्द, लहान मुले जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. परंतु यावर कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही.