spot_img
spot_img

💥रस्ता नाही चिखलवाट! – स्वातंत्र्याच्या पंचाहत्तीनंतरही लिंगावासी भोगताहेत नरकयातना! – आमचे जगणे मान्य नाही का ? ग्रामस्थांचा संतप्त सवाल!

सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात अनेक गावे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही दुर्लक्षीतपणाचा कलंक भाळी मिरवित आहेत. यातील एक गाव असलेल्या लिंगा-काटे पांग्री येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या रस्ते, नाली, पाणी यासारख्या मुलभूत सुविधांपासून अक्षरश: वंचित आहेत. त्यामुळे ‘आमचे जगणे मान्य नाही का ?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

सिंदखेडराजा तालुक्यातील लिंगा-काटे पांग्री केवळ नावापुरते असलेल्या इथल्या ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियाेजनामुळे नागरिक नरकयातना भाेगत आहेत. त्यात शासन, प्रशासन आणि लाेकप्रतिनिधींचेही कमालीची अनास्था दिसून येत आहे. या गट ग्रामपंचायतीतील लिंगा या साधारणत: ७०० लाेकसंख्येचे आडवळणी गाव आहे. येथील बहुतांश नागरीकांचा उदरनिर्वाह शेतीवर अंवलंबून आहे. येथील ग्रामपंचायत केवळ शाेभेची वास्तू ठरल्याने गावात साधा पक्का रस्ता देखील उरलेला नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. नाल्या नाहीत. याचा परिणाम येथील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. गावात अनेक वर्षांनंतर पाणीपुरवठ्याची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, ही पाईप लाईनसाठी गावातील काॅंक्रीटचा मुख्या रस्ता पूर्णपणे खाेदून काढण्यात आला आहे. साेबतच गावातील नाल्या देखील नेस्तनाबूत झाल्या आहेत. दरम्यान पाईप लाईन टाकून माेठा कालावधी लाेटला असतानाही रस्त्याच्या कामाकडे पूर्णत: दूर्लक्ष झाले असल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. गावातील सांडपाणी याच रस्त्यावरून वाहते. परिणामी जागाेजागी गटारे तुंबली आहेत. त्यामुळे मच्छर निर्माण होऊन रोगराई पसरण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे ज्या पाईपलाईनसाठी गावातील रस्ता खाेदण्यात आला ती पाईपलाईन देखील केवळ दिखावा ठरला. गावातील नागरिकांना आजही विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.

▪️जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी!

गावातील रस्ता चालण्या याेग्य राहिला नाही. गावात कुणी आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यातही नेता येत नाही. विद्यार्थ्यांना दरराेज शाळेत ये-जा करण्यासाठी त्रास हाेताे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींची दखल घेवून गावातील मुलभूत सुविधांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी येथील बाळकृष्ण चेके, सुनिल चेके, भानुदास पैठणे, पांडुरंग चेके, शंकर भालेराव, संजय गाढवे, उमेश भालेराव, ज्ञानेश्वर चेके, भारत चेके, अनंथा पैठणे, समाधान चेके, नवरत्न मानवतकर, लताबाई जाधव, सुरेश चेके, उध्दव चेके, संजय चेके, सचिन चेके, कैलास चेके, समाधान पैठणे, राधेश्याम शिंदे, पांडूरंग चेके, प्रदीप भालेराव, शिवानंद चेके, भारत चेके यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!