बुलढाणा (हॅलो बुलडाणा) इतरांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या जिल्हा आरोग्य सेवेतील 17 कंत्राटी वाहन चालकांचे तब्बल 18 महिन्यांपासून वेतन थकल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान तात्काळ वेतन अदा करून कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी जिल्हाशल्य चिकित्सक यांच्याकडे करून संबंधितांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेतील 102 रुग्णवाहिकेचे 17 कंत्राटी वाहन चालक यांचे तब्बल 18 माहिन्यांचे वेतन ठप्प झाले आहे. हे वाहनचालक ऊन, पावसाची पर्पा न करता गंभीरस्थितीतील रुग्ण,गरोदर माता, बालके आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे करतात. जिल्ह्यातील आरोग्यसेवा अविरत सुरू राहावी यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे.परंतू दुदैवाची बाब अशी की, इतरांच्या आरोग्यांची काळजी वाहणाऱ्या या वाहन चालकांचे 18 महिन्या पासून वेतन थकीत असल्याने या वाहन चालकांना वाढत्या महागाईत त्यांच्या कुटुंबाचा डोलारा सांभाळणे कठीण झाले आहे. जवळपास त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. मागील दीड वर्षापासून वेतनापासून वंचीत असल्याने उसनवारी आणि कर्जाच्या डोंगराखाली कंत्राटी वाहनचालक दबले असून, मुलांच्या शाळेची फी घराचे भाडे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत अशी कठीण अवस्था झाली आहे.दरम्यान याप्रकरणी कंत्राटी वाहन चालकांनी न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावले. न्यायालयाने सकारात्मक निर्णय दिला तरी रुग्णालय प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हा शल्यचिकित्सक व संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.