शेगाव (हॅलो बुलडाणा) शेगावची तेजतर्रार मुलगी गायत्री रोहनकर हिने दुबईत पार पडलेल्या ‘मिस एशिया वर्ल्ड 2025’ या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत खणखणीत विजय मिळवत भारताचं नाव अभिमानाने उंचावलं आहे. २२ जून रोजी ब्रिस्टोल हॉटेल, देरा येथे पार पडलेल्या या दिमाखदार स्पर्धेत ४० हून अधिक आशियाई देशांच्या प्रतिनिधींना पछाडत गायत्रीने हा बहुमान पटकावला.
गायत्रीचं सौंदर्य, तीव्र बुद्धिमत्ता, सामाजिक बांधिलकी आणि प्रभावी संवादकौशल्य यांमुळे परीक्षक भारावून गेले. अंतिम फेरीत तिने दिलेलं उत्तर, “सौंदर्य म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात आशा निर्माण करणारी प्रेरणा असते,” या वाक्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध केलं. परीक्षकांच्या एकमताने तिला विजेतेपद बहाल करण्यात आलं आणि प्रसिद्ध अभिनेत्री अदिती गोवितकर यांच्या हस्ते तिला ताज परिधान करण्यात आला.शेगावच्या या कन्येने केवळ सौंदर्य नव्हे, तर सामाजिक कार्यातही मोलाचं योगदान दिलं आहे. ‘उज्ज्वला’या उपक्रमातून तिने ग्रामीण मुलींसाठी आरोग्य व शिक्षण विषयक चळवळ उभी केली आहे. इंजिनीअरिंगनंतर मॉडेलिंग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करताना गायत्रीने आपल्या कुटुंबीयांचे, राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल केलं आहे.