डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड)
‘हॅलो बुलढाणा’ने बातमी टाकली की, ॲक्शन झालीच पाहिजे असा विश्वास अनेकांना वाटतो. कारण समस्यांविरोधात दक्ष पहारेकरी म्हणून ‘हॅलो बुलढाणा’ची घोडदौड सुरू आहे.याचा पुन्हा प्रत्यय आला. ‘रस्ता बंद विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले’ या मथळ्याखाली नुकतेच दणकेबाज वृत्त प्रसारित केल्याने सार्वजनिक बांधकाम यंत्रणा जागी होऊन, दूरवस्थेतील पूलावर भराव टाकण्यात आला आहे. परंतू तात्पुरती डागडूजी करून चालणार नाही तर हा प्रश्न कायमस्वरूपी व्यवस्थित सोडवावा लागणार आहे.
अतिवृष्टीमुळे सहकार विद्या मंदिर जवळच्या नाल्यावरील पूलाला मोठ मोठे तडे जाऊन भगदाड पडले होते.त्यामुळे आरेगाव मार्गे धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसच्या फेऱ्या तातडीने थांबविण्यात आल्या.परिणामी विद्यार्थी, कर्मचारी व सर्वसामान्य प्रवाशांची प्रचंड गैरसोय सुरू झाली.दरम्यान या समस्या संदर्भात ‘हॅलो बुलढाणा’ने आपल्या शैलीत वृत्त प्रसारित केले होते.या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. पुलावर भगदाड पडलेल्या जागेत आता ट्रॅक्टर द्वारे मुरूम टाकण्यात आला.मात्र हे काम थातुरमातुर असून, एखादा पाऊस आल्यास मुरूम वाहून जाणार असल्याचे ग्रामस्थ म्हणत आहेत.या पुलावरून ट्रॅक्टर किंवा बस जाऊ शकत नाही. एखादे वाहन गेल्यास अपघाताचा शंभर टक्के धोका आहे. राज्य परिवहन महामंडळाने बस न पाठवण्याची भूमिका घेतली आहे.दरम्यान रस्ता थांबल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून गावातील प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.