बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी एका छोटेखानी समारंभात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडू पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्या दालनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व बुलढाणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी त्यांच्याशी भेट घेत पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. त्यावेळी विविध विभागांचे सविच उपस्थित होते.
भारतीय प्रशासकीय सेवेतील तब्बल ३७ वर्षानंतर सुजाता सौनिक आज निवृत्त झाल्या. मुख्य सचिवपदासाठी राजेश कुमार यांच्यासह गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय.एस. चहल, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आदी अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. पण ज्येष्ठतेनुसार राजेश कुमार यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. १९८८च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी राजेश कुमार मुळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे. सोलापूर जिल्हयात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरूवात करणाऱ्या राजेश कुमार यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिव,जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महापालिका आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त. उद्योग, ग्रामविकास, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून काम केले आहे. राजेश कुमार यांना मुख्य सचिवपदासाठी केवळ दोनच महिने मिळणार असून ते आॅगस्ट मध्ये निवृत्त होतील.