देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/ संतोष जाधव) खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा वाढला असून, सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या महसूल पथकाने सिनेस्टाईल पाण्यात हनुमान उड्या घेत वाळू तस्करांचा पाठलाग केला मात्र ते सराईत असल्याने फरार झाले तर 4 बोटी जिलेटीनद्वारे नष्ट करण्यात आल्या आहेत.
खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 4 बोटी 1 जुलैला नष्ट करण्यात आल्या. मौजे देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरण कमान पासून जवळ मेहुनाराजा शिवारात, जलाशयच्या काठी दुपारी अवैध वाळू उत्खनन प्रतिबंधक पथकास 4 अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी, जलाशयातून आणलेली वाळू काठावर आणताना आढळून आल्या. सदरील बोटींवर 10 ते 12 मजूर होते. त्यांनी बोटी पळवायचा खूप प्रयत्न केला परंतु पथकातील ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी पाण्यात उतरून जाऊन त्या बोटी ताब्यात घेतल्या. त्यानंतर त्यांनी बोटिंमधील मजूरांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते पाण्यातून पलीकडे उडी मारून पसार झाले. सदरील बोटींना पाण्यातून बाहेर काढणे अशक्य असल्यामुळे त्या बोटींना त्याच ठिकाणी काठावर जिलेटिन द्वारे नष्ट करण्यात आले. सदरील कार्यवाही जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या व उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी रामदास मांटे, ग्राम महसूल अधिकारी कृष्णा खरात, सुमित जाधव, संजय बरांडे, सरिता वाघ, तांबे, श्रीम. रगडे, शिपाई ताठे व महसूल सेवक खंदारे, सचिन पुरी, विठ्ठल हरणे, मारुती बंगाळे, कविता खरात, सचिन बंगाळे, पवन देढे, वैशाली देशमाने यांनी पार पडली. यावेळी खडकपूर्णा प्रकल्पाचे स्मित येसनसूरे, व त्यांचे कर्मचारी तसेच पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण व वायाळ उपस्थित होते.