चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) ब्रिटीशकालीन सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या विश्राम गृहाच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी जिल्हाधिकारी यांनी तब्बल 80 लाखाचा निधी मंजुर केला असता सदर इमारतीचे जतन होणे अपेक्षित होते. यामुळे ऐतिहासिक ठेवाही जपता आला असता आणि नवीन इमारात बांधण्याचा खर्चही वाचला असता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रातोरात ही इमारत पाडली. कुठल्याही प्रकारच्या शासकीय परवानग्या नसतांना केवळ तोंडी आदेशावर विश्रामगृह पाडण्यात आले. यावर चिखली तालुका व शहर काँग्रेसने घेराव आंदोलन करत ब्रिटीशकालीन विश्राम गृहाची इमारत मजबुत करण्याऐवजी नियमबाहय पाडणाऱ्या आधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे.
काँग्रेसकडून यासंदर्भात ३० जून रोजी चिखली तहसिलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, नियमांनुसार धोकादायक किंवा दुरूस्त होण्यापलीकडच्या स्थितीत असल्याखेरीज कोणतीही इमारत पाडण्यात येवु नये,असे असतांना चिखली येथील विश्रामगृहाच्या बाबतीत हे पाडकाम नियमांमधील नमुद केलेल्या आधिकारांच्या मर्यादेबाहेर आहे. सरकारने सार्वजनीक बांधकाम विभागाचे नाव बदलुन सार्वनीक पाडकाम विभाग ठेवावे. सध्या बांधकाम व दुरूस्ती करण्याऐवजी त्यांचा वास्तु पाडण्यावरच जास्त भर आहे. अभियंता व ठेकेदारांच्या सरकारातील मालकांनी त्यांना बांधकाम पाडण्याची व मलीदा लाटण्याची पुर्ण मुभा दिली असावी असे वाटते. याची सखोल चौकशी होवुन संबंधीतांना निलंबीत करून त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसेच सरकारी मालमत्तेची नुकसान भरपाई त्यांचेकडुन तात्काळ वसुल करून घेण्यात यावी, अन्यथा चिखली काँग्रेसच्या वतीने यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. याप्रसंगी यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर अध्यक्ष राहुल सवडतकर, डाॅ. मोहमंद इसरार, सचिन बोंद्रे, प्रा.राजु गवई सर, प्रा. निलेश गांवडे सर, किशोर कदम,युवक काॅगे्रसचे विकास लहाने, डाॅ. सत्येंद्र भुसारी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
▪️मलिदा खाणाऱ्यांना तात्काळ निलंबित करा : राहुल सवडतकर
घेराव आंदोलनात अधिकाऱ्यांना विश्रामगृह पाडण्याचा जाब विचारला असता त्यांनी पहिले परवानगी होती असे सांगितले. नंतर काही वेळातच परवानगी नसल्याचे सांगून तोंडी आदेशावर इमारत पाडल्याचे सांगितले. अधिकारी उडवा- उडवीची उत्तरे देत सत्यता लपवत आहे. या प्रकरणामध्ये मोठा प्रमाणात मलिदा लाटण्याचा प्रयत्न होत असून अनेकांचे आर्थीक हितसंबध दडले आहे. धोकादायक किंवा जीर्ण स्वरुपातील पूल, बांधकाम पाडायचे असल्यास अनेक कायदेशीर परवानग्यांची पूर्तता करावी लागते. मात्र विश्रामगृह पाडतांना फक्त तोंडी आदेशच चालले. नियमांची पायमल्ली करणाऱ्या तसेच मलिदा खाणाऱ्यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी चिखली शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल सवडतकर यांनी केली आहे.