चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखली शहरातील सिद्धार्थ नगर, प्रभाग क्रमांक ९ मधील मुस्लिम कब्रस्तानाची भिंत पहिल्याच पावसात कोसळल्याने प्रचंड संताप निर्माण झाला आहे. भिंत पडताच मोकाट जनावरांनी थेट कब्रस्तानात घुसखोरी केली असून, त्यामुळे अनेक कबरींची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकारामुळे संपूर्ण मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली असून, प्रशासनाविरोधात संतप्त भावना उफाळून आल्या आहेत. धार्मिक व भावनिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र असलेल्या कब्रस्तानाची अशी दुर्दशा झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. याआधीही भिंतीच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी ही दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक मोहम्मद आसिफ भाई यांच्या मार्गदर्शनाखाली आसीफ भाई मित्र मंडळ, इंदिरा नगरने सोमवार ३० जून रोजी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करत कब्रस्तानाच्या भिंतीचे तातडीने व भक्कम पुनर्बांधणीची जोरदार मागणी केली. फक्त तात्पुरते नव्हे, तर कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.निवेदन देताना मित्र मंडळाचे सर्व सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.