देऊळघाट (हॅलो बुलडाणा/ इम्रान खान) देऊळघाट येथील जिल्हा परिषद कनिष्ठ विज्ञान उर्दू महाविद्यालयात इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी तातडीने तुकडी मंजूर करावी व रिक्त शिक्षक पदे भरावीत, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.ग्रामपंचायत उपसरपंच आरीफ खान व सदस्यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, देऊळघाट हे सुमारे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून बहुतांश लोक शेतमजुरीवर अवलंबून आहेत. गावात जिल्हा परिषद उर्दू शाळा दहावीपर्यंत असून, यावर्षी १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींचा मोठा सहभाग आहे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांना बाहेरगावी शिक्षण घेता येत नाही. त्यामुळेच स्थानिक पातळीवर ११ वीची तुकडी मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्या ऑनलाईन पद्धतीने प्रवेश सुरू असून गावातील अन्य कॉलेजेस इंग्रजी माध्यम व खासगी असल्याने उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य नाही. त्यांची शिक्षणापासून फारकत होऊ नये, यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.या मागणीला ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक अहमद, गजनफरउल्लाह खान, माजी सरपंच जुनेद खान, रसुल खान, विकास देशमुख यांच्यासह अनेकांचा पाठिंबा असून, लवकर निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.