बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या उल्कानगरी अर्थात लोणार सरोवरामुळे लोणार जगाच्या नकाशावर पोहोचलेले आहे. परंतु या पर्यटन स्थळाकडे पर्यटक पाठ फिरवत असून याला कारणीभूत अनेक गैरसोयी आहेत. तेव्हा लोणार येथील विकास करण्यात यावा, अशी अपेक्षा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊंची नगरी आहे. येथेही पाहिजे तसा विकास झालेला नाही. तसेच जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांची दयनीय अवस्था झालेली दिसते. सुसंस्कृत व शिक्षित म्हटल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात शिक्षणाचे वाभाडे निघत आहे. बारावीत शिकणारी मुले कॉप्या करून पास होतात. त्यांचे वडीलही वाटेल ते पैसे उधळतात. परंतु ही मुले पुढे जाऊन भविष्यात करणार तरी काय? असे रोखठोक प्रश्न उपस्थित करून भाईजींनी भाषणातून टाळ्या घेतल्या. शिवाय ते म्हणाले की कुणी आमदार होते कुणी खासदार होते आणि कोणी मंत्री परंतु पाच वर्ष राहूनही विकास साधला जात नाही. त्यामुळे जिल्ह्याचा विकास कसा होईल याकडे भाईजींनी लक्ष वेधले.