spot_img
spot_img

पुर्णा नदीपात्र पोखरले! – मंठा तालुक्यातील तळणी परिसरात वाळूची सुसाट वाहतूक!

तळणी (हॅलो बुलडाणा) मंठा तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या तब्बल १० वाळू पट्ट्यातून लिलावापुर्वी नियमबाह्य वाळूचे बेसुमार उत्खनन सुरु आहे. विशेष म्हणजे , तहसीलदारांनी पथकांची नियुक्ती केली खरी पण , स्थानिक वाळूचोर पथकाला हुलकावणी देऊनही अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचा सपाटा सुरू आहे.

मंठा तालुक्यातील पुर्णा नदीकाठच्या खोरवड , देवठाणा , उस्वद , हनवतखेडा , कानडी , टाकळखोपा , वाघाळा , किर्लाक्ष, पोखरी केंधळे , भुवन-वझर सरकटे या गांवच्या हद्दीतून ऑक्टोंबर २०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंत अंदाजे २५ हजार ब्रास वाळू उत्खनन करून ६ ते ७ हजारांत जागेवर टिप्पर भरुन विक्रीचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप आहे. पुर्णा नदीकाठच्या गावांत वाळू विक्रीतून दररोज लाखांची कमाई सुरू असल्याचे सांगितल्या जात आहे. या पुर्णा नदीकाठच्या अवैध वाळू विक्रीला मंठा महसूल व पोलीसांसोबत आरटीओचे ‘अर्थपूर्ण’ सहकार्य असल्याच्या तक्रारी वाढल्याचाही आरोप आहे.
तब्बल १५० टिप्पर मधून वाळू वाहतूक चालते? हे यंत्रणेला दिसत नाही काय?असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पुर्णा नदीकाठच्या टाकळखोपा , वाघाळा , किर्ला, उस्वद ,देवठाणा‌, कानडी , हनवतखेडा , पोखरी केंधळे व भुवन ही गावे अवैध वाळू उत्खनन व विक्रीची केंद्र बनली आहे. डझनभर जेसीबी , ५० ते ७० ट्रॅक्टर व दीडशे टिप्पर मधून बुलढाणा , वाशिम , हिगोली, परभणी व जालना जिल्ह्यातील लोणार – मेहकर , रिसोड, सेनगाव , जिंतुर , मंठा व सेवली भागातील बांधकामांना चढ्या दराने वाळूची विक्री सुरू आहे.

▪️या मार्गांवर वाळू वाहतूक चालते!

टाकळखोपा -वाघाळा येथील टिप्पर इंचा – शिरपूर पांदण मार्ग पोलीस चौकीचा पाठीमागून खडी मशीन वरुन लोणार कडे , उस्वद – देवठाणा – कानडी येथील टिप्पर देवठाणा- बन मार्गे लोणार , लोणी मार्ग रिसोड , कापडसिंगी मार्ग सेनगाव कडे , किर्ला व हनवतखेडा येथील टिप्पर गारटेकी मार्गे मंठा कडे , पोखरी केंधळे व भुवन येथून वझर सरकटे मार्ग बैलोरा चौफुली- सेवली व वाटुर कडे वाळू वाहतूक करतात.

▪️कारवाई न करण्यासाठी लाखोचा हप्ता?

पुर्णा नदीकाठच्या १५ गावांतील जेसीबी , ट्रॅक्टर टिप्पर धारकांकडून कारवाई न करण्यासाठी महिन्याला लाखोंचा हप्ता वसुल केला जातो. हप्ते न देणाऱ्या वाहनांवर ठरवून कारवाई केली जात असल्याचा आरोप उबाठाचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे , पुर्णा नदी बचाव समितीचे अध्यक्ष रामदास कांगणे , उस्वदचे माजी सरपंच राम चट्टे , कानडीचे माजी सरपंच केशव खंदारे , किर्लाचे आशिष चव्हाण यांनी केला आहे.

▪️दिवसभर तलाठी गस्तीवर … उस्वद- देवठाणा सज्जाचे तलाठी नितीन चिंचोले यांना विचारले असता , उस्वद – देवठाणा भागात दिवसभर गस्तीवर असल्याचे सांगितले.

▪️मंडळ अधिकारी सुट्टीवर … तळणी मंडळ अधिकारी अनिल उफाड यांना विचारले असता , मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने सुट्टीवर असल्याचे सांगितले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!