बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्यात जिजामाता स्टेडियमवर आज एक अद्वितीय आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला. भडगावचे तेजस संजय कोचर (वय २४) आणि हिंगोणा येथील महिमा प्रदीपकुमार बोरा (वय २५) यांनी ऐहिक सुखांचा त्याग करून संयमाचे, आत्मशुद्धीचे जीवन स्वीकारले. संयमाच्या मार्गावर पदार्पण करणे हे आजच्या भौतिकवादी युगात अत्यंत दुर्मिळ घडामोड ठरली आहे.स्थानकवासी जैन संप्रदायात दीक्षा घेणाऱ्या या दोघांसाठी दोन दिवसांचा भव्य दीक्षा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जैन समाजाने उत्साहाने सहभाग घेतला आहे. दीक्षा सोहळ्याआधी रक्षा सूत्र, संयम फेरे आणि सांसारिक जीवनातून विरक्ती दर्शवणारे विविध विधी पार पडले. या भाविकांनी संयमाच्या मार्गावर प्रवेश करत आत्मोद्धार व परोपकारासाठी जीवन समर्पित केले आहे.
या प्रसंगी आयोजक दीपक छाजेड यांनी सांगितले की, “ही दीक्षा केवळ वैयक्तिक प्रवास नसून समाजासाठीही प्रेरणा देणारी आहे.” तर कमलेश कोठारी यांनी सांगितले, “जिजामाता स्टेडियमवर झालेल्या या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती, आणि ही दीक्षा पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.”