बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्रात शेतकऱ्यांची बुलंद आवाज ठरलेले फायरब्रँड नेते रविकांत तुपकर पुन्हा चर्चेत आहेत, पण यावेळी कारण वेगळं आहे! ‘नथ’ नावाच्या कवितेच्या हटके सादरीकरणातून तुपकरांनी आपली संवेदनशील आणि साहित्यिक बाजू उजळून टाकली आहे. आक्रमक भाषणांनी सरकारला थरथर कापवणारे तुपकर यावेळी कविता वाचनाच्या अनोख्या अंदाजात सोशल मीडियावर गाजत आहेत.
तुपकरांच्या या कवितेने अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली असून, शेतकरी, तरुण, साहित्यिक वर्तुळात ती जोरात व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांची वेदना आणि स्त्रीच्या अस्तित्वाचा सशक्त अर्थ मांडणारी ही कविता केवळ साहित्यिक मैफल नव्हे, तर सामाजिक भाष्य ठरते आहे. ‘नेते’ म्हणून ओळख असलेल्या तुपकरांची ‘कवी’ म्हणून ओळख नव्याने घडते आहे.
साहित्य संमेलने, गझल मैफिली, नवोदित कवींना व्यासपीठ देणे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन—या सगळ्या गोष्टी तुपकर नियमित करतात, हे विशेष. आक्रमक राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुपकरांचा हा भावनिक, संवेदनशील पैलू अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरत आहे.शब्दातून शेतकऱ्यांची वेदना, कवीतून नारीशक्तीचा सन्मान आणि सादरीकरणात सच्चेपणा—या त्रिसूत्रीने ‘नथ’ कविता तुफान लोकप्रिय झाली असून, “राजकारणातही कविता असते” हे सिद्ध करणारा हा नवा तुपकर अनेकांच्या मनात घर करत आहे.