बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि सगळ्या पक्षांनी मोर्चाबांधणीला सुरुवातही केली आहे. मात्र यात पुन्हा एकदा नेहमीचाच प्रश्न समोर आला आहे – राजकारण म्हणजे काही मोजक्या घराण्यांचीच मक्तेदारी आहे का?
नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य अशा पदांवर निवडून येणाऱ्यांत बहुतांश वेळा तेच ‘राजकीय वारसदार’ किंवा जुन्या नेत्यांचे नातेवाईक दिसतात. सामान्य जनतेचा प्रतिनिधी कुठे आहे? पत्रकार, शिक्षक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते – हे सगळे काय फक्त सतरंज्या उचलायला व मत देण्यासाठीच? कोणताही पक्ष असो उमेदवारीसाठी सर्वसामान्य माणसाची दारं कायम बंदच दिसतात. काही ठिकाणी तर मागे पडलेले, कामगिरीहीन नेते पुन्हा पुन्हा पुढे रेटले जातात. समाजकारणाच्या नावाखाली केवळ ‘पैसाकारण’ सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसते.
जनतेमध्ये आता संतापाची लाट आहे. विकासासाठी नव्या चेहऱ्यांची गरज आहे, जुन्या साच्यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. पक्षांनी जर यावेळी देखील पारंपरिक चेहऱ्यांनाच संधी दिली, तर मतदारही यावेळी गप्प बसणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ ठरेल!