डोणगाव (हॅलो बुलडाणा) डोणगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून महसूल व पोलिस विभागाच्या आशीर्वादाने दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी सुरू आहे.
विशेष म्हणजे वाळूच्या वर चूरीचा थर घालून वाहतूक केली जाते. मात्र या वाळू तस्करीकडे संबंधित विभागाची डोळेझाक सुरू आहे.
शासनाने एकाही वाळू घाटाची हर्रासी केलेली नाही. सुरु असलेल्या बांधकामांना वाळूची मागणी आहे. दहा ते बारा हजार रुपये ब्रास ने वाळू विक्री होते.बक्कळ पैसा मिळत असल्यामुळे विना नंबर प्लेट ट्रॅक्टर व टिप्परने वाळू तस्करी जोमात सुरू आहे. पोलीस व महसूल विभागाने चूरीच्या वाहनाची रॉयल्टी तपासल्यास वाळू आढळून हे बिंग फुटू शकते. शिवाय गाव – खेड्यांमधून भरधाव धावणाऱ्या ट्रॅक्टरांना कोणी हटकल्यास तस्कर मुजोरीची भाषा वापरतात. पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली तर आम्ही हप्ते देतो. त्यामुळे आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, अशी मुजोरीची भाषा वापरली जाते. सुरू असलेल्या या वाळू तस्करी व ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील चांगल्या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.वाळू तस्करी जोमात असताना महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणा कोमात गेल्याचे चित्र असून, तस्करांना आळा घालणार तरी कोण? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. पर्यावरणाचे नुकसान करण्यासह शासनाच्या महसुलावर दरोडा टाकणाऱ्या तस्करांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आवर घालावा, अशी मागणी नागरीक करीत आहेत.