देऊळघाट (हॅलो बुलडाणा/इमरान खान) बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठ्या व मुस्लिम बहुल देऊळघाट ग्रामपंचायतीत ७ जून रोजी होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ५ जून रोजी शांतता समितीची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) मा. सुधीर पाटील, API शरद माळी, PSI मोरे, जमादार तायडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांनी थेट शब्दांत इशारा देत सांगितले की, “कोणीही कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
बैठकीदरम्यान मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (SDPO) पाटील साहेबांचा सत्कार माजी उपसरपंच सांडू पाटील यांच्या हस्ते, तर (API) शरद माळी यांचा सत्कार माजी सदस्यांनी केला. PSI मोर साहेबांचा सत्कार तंटामुक्ती अध्यक्ष रऊफभाईंनी केला.API शरद माळी यांनी भावनिक आवाहन करत स्पष्ट केलं की, “गोरक्षणाच्या नियमांचे पालन करून, शांततेत सण साजरा करा. भावनांवर आघात होईल असे कोणतेही कृत्य टाळा.” तर SDPO पाटील यांनी नवतरुणांना सल्ला दिला की, “मोबाईलवर कोणतीही धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकू नका; भावी आयुष्य उद्ध्वस्त होईल.” गावातील एकोप्याचे आणि सलोख्याचे वातावरण बिघडू नये, याकडे पोलिसांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. मधुकर कचोरे यांनी केले. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारामुळे बैठक यशस्वी झाली.