spot_img
spot_img

वाढदिवसाचं औचित्य, देहदानाचा संकल्प: श्री एल.वाय. निकम यांचा समाजासमोर आदर्श!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सहकार क्षेत्रात आपल्या आयुष्याची ५० वर्षे समर्पित करणारे आणि आजन्म समाजसेवेचा वसा घेतलेले आपल्या जिल्ह्यातील आदरणीय श्री एल.वाय. निकम यांनी यंदाच्या आपल्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी संकल्प केला आहे – देहदानाचा! आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी घेतलेला हा निर्णय खऱ्या अर्थाने समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करणारा आहे.श्री. निकम यांचं जीवन म्हणजे निस्वार्थ सेवा आणि कर्तव्याचं मूर्तिमंत उदाहरण. त्यांनी आपल्या कार्यकाळात जालना जिल्ह्यातील कै. बाळासाहेब पवारांच्या साखर कारखान्यात आणि त्यानंतर आशिया खंडातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या बुलढाणा अर्बनमध्ये मोलाची सेवा दिली. निवृत्तीनंतरही ते शांत बसले नाहीत, तर EPS 95 पेन्शनर्सच्या हक्कांसाठी अविरतपणे संघर्ष करत आहेत. त्यांचं हे कार्य समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी दर्शवतं.

एकिकडे व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत असतानाच, श्री. निकम यांनी आपल्या कुटुंबालाही आदर्श संस्कार दिले आहेत. त्यांची कन्या उच्चशिक्षित डॉक्टर असून, पुत्र मयूर निकम ‘झी २४ तास’ या प्रतिष्ठित वृत्तवाहिनीमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी सौ. वंदनाताई निकम यांचंही सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान आहे. मराठा क्रांती मोर्चात त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि नेतृत्वाची साक्ष देते. निकम दांपत्याचं हे समाजकार्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.

आज ५ जून रोजी, आपल्या वाढदिवसानिमित्त श्री. निकम यांनी देहदानाचा जो संकल्प केला आहे, तो केवळ एक वैयक्तिक निर्णय नसून, तो समाजाला नवी दिशा देणारा एक महान विचार आहे. देहदानाच्या या पवित्र कृतीमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळू शकतं आणि वैद्यकीय संशोधनासाठीही मोलाची मदत होते. आपल्या निधनानंतरही समाजोपयोगी ठरण्याचा हा त्यांचा निर्णय, त्यांच्या उदात्त विचारांचं आणि सामाजिक जबाबदारीचं प्रतीक आहे.श्री. एल.वाय. निकम आणि सौ. वंदनाताई निकम यांच्यासारख्या व्यक्तीमत्वामुळेच समाजात सकारात्मक बदल घडून येतात. त्यांचा हा देहदानाचा संकल्प इतरांसाठीही प्रेरणादायी ठरो आणि अधिकाधिक लोकांनी या मानवतावादी कार्यात सहभागी व्हावं, हीच अपेक्षा. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!